खतगावकर परिवाराच्या उद्दात हेतुमुळे गोरगरीब, आदिवासी विद्यार्थ्यांचा विकास- डॉ. किन्हाळकर 

296

 

 

नरसीफाटा/शेषेराव कंधारे

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. या उदात्त उद्देशामुळे आणि दूरदृष्टी कोणामुळे विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब, आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे.असे गौरवोद्गार माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर यांनी काढले. ते शंकरनगर येथे स्व.मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या द्वितीय स्मृती प्रित्यर्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर उपस्थित होते.

- Advertisement -

गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव स्व. मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दि.६ जानेवारी रोजी शंकरनगर येथे ‘मधुकरराव पाटील स्टुडन्ट प्रीमियर लीगचे'(एमपीएल) आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आरंभी स्व. मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांनी पूजन करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर विद्यालयातील वैद्यकीय शिक्षणास पात्र ठरलेल्या,शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण ठरलेल्या, इन्स्पायर अवार्ड प्राप्त झालेल्या त्याचबरोबर इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दर्पण दिनानिमित्त शंकरनगर पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांचा माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यालयाचे प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे यांनी विद्यालयात सुरू असलेले उपक्रम आणि विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या सुयशाबरोबरच विद्यालयाच्या समग्र विकासाचा संक्षिप्त आढावा सादर केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेच्या सचिव डॉ. मीनलताई पाटील खतगावकर म्हणाल्या की, स्वर्गीय दादा आज जरी आमच्यात उपस्थित नसले तरी त्यांची आठवण सातत्याने या परिसरात दरवळत आहे. ते शंकरनगर येथे येताच विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्याशी संवाद करीत असत. प्रसंगी मायेच्या ममतेने मार्गदर्शन करीत असत. अशा उत्कट मानवी मूल्ये जपणा-या व्यक्तिमत्त्वाची सतत आठवण राहावी यासाठी गतवर्षीपासून त्यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. याप्रसंगी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा स्व. मधुकरराव पाटील खतगावकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय असा नामविस्तार करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, अरुण पाटील एकंबेकर यांची समायोजित भाषणे झाली. याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की, शंकरनगर येथे ही संस्था आम्ही उभी केली आहे. तिचा सर्वांगीण विकास होताना पाहून आम्हाला वेगळा आनंद होतो आहे. या संस्थेच्या विकासात स्व. दादांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या योगदानाची, त्यागाची सतत आठवण राहावी म्हणून यापुढे दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी श्रीमती शितलताई रावसाहेब अंतापुरकर, नांदेडचे माजी उपमहापौर आनंदराव चव्हाण, सपोनि संकेत दिघे, बाळासाहेब पाटील खतगावकर, शिवाजी पाटील पाचपिपळीकर, सतीश भेंडेकर, आनंदराव बिरादार, दिलीप पांढरे, श्रीनिवास पाटील गोजेगावकर, दायमा, प्राचार्य डॉ.बी.एस.पिंपळे,मु.अ.धनंजय शेळके,मु.अ.धोंडीबा वडजे आदी मान्यवर तसेच पत्रकार, पालक, विद्यार्थी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.के. सूर्यवंशी व शिखा पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उर्मिला तोडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.