नायगाव : ताकबीड येथील सात सदस्यांपैकी चार महिला सदस्यांनी केली सरपंचाविरूध्द तक्रार
नरसीफाटा ; सय्यद जाफर
नायगांव तालुक्यातील ताकबीड येथील सरपंच आपल्या समर्थकांसह नातेवाईक यांना खुश ठेवण्यासाठी शासनाच्या 14 व्या वित्त आयोगासह अनेक निधीसह लोकप्रतिनिधींच्या विकास कामासाठी आलेल्या निधीचा व खासदार, आमदार यांच्या ही विविध योजनेच्या निधीचा दुरउपयोग करून परस्पर जवळच्या लोकांना लाभ देण्यासाठी निधी वापरल्याची तक्रार करीत खर्चीलेल्या निधीचा आणि कामाच्या ठिकाणचे तारतम्य जुळत नसल्याने याची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी तक्रार एका महीला ग्राम पंचायत सदस्याच्या प्रतिनिधीसह चार महिला ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.विशेष म्हणजे सात सदस्य असलेल्या ह्या ग्रामपंचायतीमधील चार महिला ग्रामपंचायत सदस्य तक्रार केल्याने व तक्रारीचा मुद्दा बहूमताने असल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे.
नायगांव तालुक्यातील ताकबीड येथे सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीचे अस्तित्व असून गेल्या सन २०१८ पासून आजपर्यंतच्या गावाच्या विकास कामासाठी आलेल्या 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत तसेच खासदार, आमदार निधी व दलित वस्ती यासह विविध योजनेच्या कामातून केलेल्या निधीचे खर्च हे एकच काम दुसऱ्या ठिकाणी दाखवून त्या – त्या विभागाकडून निधीची उचल करण्यात आल्याचा व समर्थनात असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना व नातेवाईकांना विविध योजनेचा लाभ देण्यात येतो असा आरोप करीत ताकबीड ग्रामपंचायतीची सात सदस्य संख्या असलेल्या पैकी त्यातील एका ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने व चार महिला ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी जि प नांदेड , तहसीलदार नायगांव खैरगाव , गटविकास अधिकारी नायगांव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आलेल्या निधीची विल्हेवाट लावत आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला सहकार्य केलेल्या गावातील नातेवाईक, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना शासनाच्या विविध योजना मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ताकबीड तालुका नायगाव येथील सरपंच यांनी आलेल्या निधीचा दुरुपयोग करीत गावाचे हित जोपासले नाही. तर आपल्या मर्जीप्रमाणे कारभार करीत गोरगरिबांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रयत्न केला.एकाच कामावर अनेक विभागाचे कामे केल्याचा प्रत्यय आणून दूस-या विभागाचे काम केल्याचे व त्याचे देयक काढल्याचा सपाटा लावला असुन बोगस कामाचे देयक काढून घेण्याचाही प्रतापही करीत आपल्या जवळील नातेवाईक व समर्थकांच्या हितासाठी पदाचा दुरुपयोग या सरपंचांनी केला असा आरोप अर्जदार तथा ग्रामपंचायत सदस्य यांचे प्रतिनिधी उमकांत माधवराव कुरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या शेषाबाई बालाजी पाटील कुरे, भागनाबाई माधव कुरे, रेणुकाबाई हिरामण पा कुरे, जनाबाई लिंगोजी इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह जि प चे मुख्यकार्यकारी अधिकारी, तहसीलदार नायगांव, गटविकास अधिकारी नायगांव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केला.