नायगावचे तहसीलदार, नगर पंचायत चे मुख्याधिकारी काँग्रेस पुढा-यांसोबत अजमेर सहलीवर

संबंधित अधिका-यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करा आमदार राजेश पवार यांची निवडणुक आयोगाकडे तक्रार

1,199

नायगाव/शेषेराव कंधारे

नायगाव येथील नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक २०२१ तोंडावर आलेली असताना तहसीलदार, मुख्याधिकारी कार्यालय अधिक्षक व तलाठी हे काँग्रेसच्या स्थानिक पुढा-यासोबत अजमेर सहिलीवर गेल्याने राजकीय वर्तुळासह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या पदाचा गैरवापर आणि पक्षपातीपणा करून एका ठराविक पक्षाला फायदा पोहचविण्याचा त्यांचा कट यामधून उजागर झाला असून या संदर्भात भाजपाचे आ. राजेश पवार यांनी राज्य निवडणुक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.

नायगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली असतानाच तहसीलदार गजानन शिंदे, न.पं. मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर, कार्यालय अधिक्षक संतराम जाधव, मंडळ अधिकारी विजय जाधव हे काँग्रेसचे स्थानिक पुढारी तथा न.पं.चे उपाध्यक्ष विजय चव्हाण व कंन्ट्रातदार् सय्यद रहिम सय्यद मीर यांच्यासोबत अजमेर सहलीवर गेले आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये सुध्दा उपरोक्त अधिकारी तेलंगणा राज्यात पाच राजकीय पुढान्यासमवेत सहलीवर गेले होते, असेही आ. राजेश पवार यांनी निवडणुक आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
                   

- Advertisement -

सदर अधिकारी नगरपंचायतीच्या निवडणुकीत पदाचा गैरवापर करून मतदार याद्यामध्ये ढवळा ढवळ करणे, वार्ड रचनेमध्ये हस्तक्षेप करणे. आरक्षणाच्या सोडतीमध्ये गोंधळ घालणे, जिल्हा प्रशासन व निवडणुक कार्यालयास खोटी माहिती कळविणे, खोटे अभिलेखे तयार करणे तसेच काँग्रेस पक्षाला व अधिकाऱ्यांचे परममित्र विजय शंकरराव चव्हाण तसेच कंत्राटदार  सय्यद रहिम सय्यद मीर यांना निवडणुकीत फायदा व्हावा त्यासाठी कट रचुन व संगणमत करुन वातावरण तयार करणे व त्यांना फायदा पोहचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या हिताचे प्रत्येक गोष्टी करणे असा प्रकार या अधिकाऱ्यांनी सुरु केला आहेत. त्यामुळे उपरोक्त अधिकाऱ्यांना न.पं. निवडणुकीत कोणतीही सक्षम जबाबदारी देवू नये तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करून आपल्या पदाचा गैरवापर करीत असल्याबाबत निलंबित करण्यात यावे असेही आ. राजेश पवार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आमदार राजेश पवार यांनी केलेल्या तक्रारारीमुळे नायगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित अधिका-यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.