आण्णाभाऊ साठे महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार सोहळा संपन्न.
जिल्हा प्रतिनिधी -तानाजी शेळगावकर
मुखेड : गुणवंतांनो उद्याचा भारत तुम्हाला घडवायचा आहे.तुम्ही मिळवलेले यश समाज घडविण्यासाठी, मानवता वाढीसाठी वापरा.जो दुसऱ्यासाठी जगतो तो आदर्श असतो. त्यांची प्रेरणा समाज घेत असतो. आपल्या देशात अनेक महापुरुषांनी समाज,देश घडविण्यासाठी आयुष्य खर्ची घातलं. वेळप्रसंगी बलिदान दिल. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण समाजासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा आणि आपण पुढील आयुष्यात यशस्वी व्हावे कारण आदर्श राष्ट्रनिर्मितीसाठी तुमच्यासारख्या गुणवंतांची गरज आहे. यासाठी माझे तुम्हाला अनंत आशीर्वाद आहेत. असे भावपूर्ण उद्गगार डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी काढले.
डॉ. शिवाचार्य महाराज म्हणाले की, मानवी जीवन सुखकर करण्यासाठी गुणवंतांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाने केला पाहिजे.गुणवंत घडविण्यासाठी गुरुजन,माता आणि पालक महत्त्वाचे घटक असतात. ते संस्काराची शिदोरी देत असतात.म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांसह गुरुजनांचा आशीर्वाद घ्यावा त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करावी परिश्रम करावेत यश नक्कीच मिळते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर तोटरे यांनी केले.याप्रसंगी महाविद्यालयाच्या विकासाचा, गुणवंतांच्या यशाचा,शिक्षकांच्या कष्टाचा गौरव करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.आमचे महाविद्यालय,शाळा गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी सतत अग्रेसर आहे. आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. यात पालकांनीही आपली महत्त्वाची भूमिका पार पाडावी. म्हणजे आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त विद्यार्थी मोठ्या पदावर जातील.पर्यायाने आपल्या देशाचा, समाजाचा विकास होईल.उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी नवोदय,वैज्ञानिक परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षेवरती जास्तीत जास्त शिक्षकांनी व पालकांनी लक्ष द्यावे आणि प्राथमिक शाळेतच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करावी असे आवाहन केले. लहानपणा पासूनच विद्यार्थी जीवनात वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याची जिद्द निर्माण झाल्यास भविष्यात तो स्पर्धा परीक्षेत यशस्वी होईल असे ते म्हणाले. याप्रसंगी येथील गटशिक्षणाधिकारी कैलास होणदरणे म्हणाले की आपली शाळा,महाविद्यालय गुणवंतांचा कारखाना आहे.इथे दरवर्षी अनेक विद्यार्थी विविध परीक्षेत अव्वल ठरलेली आहेत. याचा मी साक्षीदार आहे म्हणून मी या शाळेचे,महाविद्यालयाचे अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाला प्रेरित होऊन अभ्यास केला पाहिजे.यश सहज मिळत नाही त्यासाठी परिश्रम करावे लागतात.सातत्य हे यशाचे गमक आहे.ते आपण ठेवले पाहिजे. पालक प्रतिनिधी म्हणून डॉ.अशोक कोरवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले माझा मुलगा नीट सारख्या देश पातळीवरील परीक्षेत यशस्वी झाला त्याच्या पाठीमागे या महाविद्यालयाचे शिक्षकांचे फार मोठे योगदान आहे.आयुष्यात चांगला गुरु मिळाला तर आयुष्याचे सोने होते.हे मी माझ्या आणि माझ्या मुलाच्या अनुभवातून सांगतो.आभ्यासातील सातत्य हेच माझ्या मुलाचे यश आहे.म्हणून तुम्ही कोणतेही कार्य करा ते निष्ठेने करा.त्यात सातत्य ठेवा यश नक्की मिळते असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी जी.एम.कांबळे म्हणाले आमच्या संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी समाज घडविला आहे.याचे अनेक पुरावे आहेत. महाराष्ट्रात अनेक पदावर आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत.ही परंपरा सातत्याने चालू आहे.विद्यार्थी हाच आमच्या संस्थेचा केंद्रबिंदू आहे. इथे मुले घडतात. सर्वांगीण संस्कार त्यांच्यावर व्हावे, ते आदर्श नागरिक बनावेत यासाठी आमची संस्था क्रियाशील आहे. याप्रसंगी वेदांग अशोक कोरवार,गौरंग अविनाश पाळेकर, विठ्ठल सुधीर पाटील ,सानिया सत्तार शेख, माधवी शिवमुर्ती मठपती, गंगासागर बाबुराव गजलवाड, संविधान उत्तमराव होनवडजकर,महादेव सुधाकर बोडके, निकिता यशवंत बेळीकर या गुणवंत विद्यार्थ्यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसचंलन डॉ. महावीर उदगीरकर यांनी तर आभार उपप्राचार्य संजीव डोईबळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य संदीप केरुरे,डॉ.केशव पाटील,डॉ.सोपान ढवळे, प्रा.बसवेश्वर स्वामी,प्रा.नारायण शिंदे,प्रा.सौ. सरिता पुरी,प्रा.सौ मेघा सुगावकर आदींनी मेहनत घेतली.कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
