रामतीर्थ येथे शुल्लक कारणावरून तरूणांच्या पोटात चाकुने भोसकले , जखमी वर नांदेड येथे उपचार सुरू.

533

 

नरसीफाटा/ शेषेराव कंधारे

रामतिर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत चाकु हल्ल्यांचे प्रमाण वरच्या वर वाढले असून दि.१७ मार्च रोजी रामतीर्थ पोलीस स्टेशन पासून जवळच असलेल्या गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या कॉलनीतील राम गंगाधर टेकाळे वय २७ वर्षे या तरुण युवकांच्या पोटात शुल्लक कारणावरून चाकूने भोसकून गंभीर जखमी केले असून गंभीर जखमी असलेल्या तरुण युवकावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीस रामतीर्थ पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील मूळ रहिवासी असलेले सध्या गेल्या काही वर्षापासून रामतीर्थ (शंकरनगर) येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या वसाहतीमध्ये असलेल्या रिकाम्या कॉटर मध्ये वास्तव्यास असलेले राम गंगाधर टेकाळे हे दि.१७ मार्च रोजी सायंकाळी साडे आठच्या सुमारास घरासमोर असलेल्या समाज मंदिराच्या ओट्यावर बसला असताना रामतीर्थ ता. बिलोली येथील ज्ञानेश्वर शेषराव देगलूरे वय २५ वर्षे यांनी तू येथे का बसलास म्हणून वाद घालुन कमरेला असलेला चाकू काढून राम टेकाळे यांच्या पोटात खूपसला असता टेकाळे यांच्या पोटातील आतडी बाहेर येऊन तो गंभीर जखमी झाला.

       ही घटना समजताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन गंभीर अवस्थेतील राम टेकाळे यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले असून सदरील प्रकरणी राम टेकाळे यांनी दिलेल्या जबाबावरून पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर देगलूर यांच्या विरुद्ध गुरन ४६/२०२२ कलम ३०७ नुसार दि.१८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपींना १९ मार्च रोजी बिलोली न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गोदावरी मनार सहकारी साखर कारखाण्याच्या वसाहतीमध्ये १ डिसेंबर २०२१ च्या मध्यरात्री रामतीर्थ येथील ७५ वर्ष वयोवृद्ध आजी अन्वरबी मैनोद्दीन शेख हिचा दगडाने ठेचून खून करण्यात आला तर ४ जानेवारी रोजी निजामाबाद जिल्ह्यातील खानापूर येथील पंढरी लक्ष्‍मण पांचाळ यांना मटक्याच्या पैशाच्या कारणावरून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले तर ११ फेब्रुवारी रोजी डोणगाव येथील राजेश शिवराम वाघमारे वय ३० वर्ष यांच्या पोटात चाकुने भोसल्याची घटना रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या जवळ घडलेली असताना दि.१७ मार्च रोजी सायंकाळी नऊच्या सुमारास डोंगरगाव तालुका मुखेड येथील मूळ रहिवासी असलेल्या परंतु गेल्या अनेक वर्षापासून रामतीर्थ ( शंकरनगर) येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेल्या राम टेकाळे यांच्या पोटात चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने या वसाहतीमध्ये वारंवार गंभीर गुन्ह्याच्या घटना घडत असल्याने सामान्य नागरिकात भितीचे वातावरण पसरले असून पोलिस प्रशासनाने गस्त घालत जनतेची सुरक्षा करावी अशी मागणी सामान्य नागरिकांतून केल्या जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.