नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क :-
नायगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांनी भर उन्हात रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ग्राहकांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून गॅस एजन्सीकडे सिलेंडरची मागणी करूनही पुरवठा होत नाही. त्यामुळे महिलांना स्वयंपाकासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. काही नागरिकांनी सिलेंडर बुक करूनही वेळेवर डिलिव्हरी मिळत नसल्याची तक्रार केली.
नायगाव येथे गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने संतप्त ग्राहकांनी भर उन्हात रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी यांनी जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा करण्याचे आदेश दिले असतानाही संबंधित गॅस एजन्सीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे “जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली” असे म्हणत नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
नायगाव शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा दिवसेंदिवस गंभीर बनत असून ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गॅस सिलेंडर प्रत्यक्षात घरपोच न करता ग्राहकांच्या मोबाईलवर “डिलिव्हरी पूर्ण” झाल्याचे मेसेज येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अनेक ग्राहकांनी सिलेंडर बुक केल्यानंतर अनेक दिवस वाट पाहूनही गॅस मिळत नसल्याची तक्रार केली. मात्र, प्रत्यक्ष पुरवठा न करताच डिलिव्हरीचा मेसेज पाठवला जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे महिलांना स्वयंपाकासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.






