जिल्हा परिषदजिल्हावार्तानांदेड

ग्रामीण भागातील 1 लाख 50 हजार घरांवर महिलांच्या हस्ते तिरंगा फडकणार..!


 

 

नांदेड एक्स्प्रेस न्यूज नेटवर्क…

दि. 01:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमाबाबत नांदेड जिल्‍हयातील ग्रामीण भागातून पाच लाख घरांवर तिरंगा फडकवणार असून किमान 1 लाख 50 हजार महिला आपल्या घरावर स्वतः राष्ट्रध्वज लावून राष्ट्राला अनोखी सलामी देणार असल्याची माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

 

भारतीय स्‍वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्‍या मनात स्‍वातंत्र्याच्‍या आठवणी उजळून निघाव्‍यात तसेच स्‍वातंत्र्य लढयाच्‍या स्‍मृमी तेवत राहाव्‍यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्‍यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यानिमित्‍त आज झूम मिटिंगव्‍दारे मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ग्रामीण भागातील महिला स्वंय सहायता समूहातील सदस्यांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री गजानन पातेवार साहेब व जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार यांची उपस्थिती होती.

 

तिरंगा फडकवताना तिरंग्याचा कुठेही अपमान होऊ नये याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. राष्ट्रीय ध्वज हा हाताने कातलेला, विणलेला अथवा मशीनव्‍दारे तयार केलेला कापडी, खादी, पॉलिस्टर किंवा लोकरीपासून तयार केलेला असावा. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. तिरंग्याचा आकार हा 3:2 या प्रमाणात राहील असा असावा. तिरंग्याचा केशरी रंग हा वरच्या बाजूला आणि हिरवा रंग हा खालच्या बाजूला असावा. राष्ट्रध्वज स्तंभाच्या वरच्या टोकाला लावावा. त्या ध्वजावर इतर कोणताही ध्वज सोबत लावू नये. राष्ट्रध्वजावर कोणतेही अक्षर किंवा चिन्ह लिहू नये तसेच स्तंभाच्या वर आणि आजूबाजूला काहीही लावू नये. राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला मळलेला अथवा चुरगळलेला असू नये. तसेच राष्ट्रध्वजाचा कुठल्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून वापर करू नये. ध्वज फाटणार नाही याची काळजी घ्यावी. राष्ट्रध्वज उतरताना पूर्ण सन्मानाने आणि सावधतेने उतरवावा. राष्ट्रध्वज उतरल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आणि अस्मिता असल्‍याचेही वर्षा ठाकूर-घुगे मॅडम म्‍हणाल्‍या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »