‘गोदावरीत’ मिळाणार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात मोफत प्रवेश.
बिलोली/शेषेराव कंधारे
धनगर समाज बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने धनगर समाजातील मुलांमुलींसाठी वर्ग पहिलीपासून बारावीपर्यंत नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत मोफत निवासी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात नांदेड जिल्ह्यातून शंकरनगर ता.बिलोली येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलच्या निवासी इंग्रजी माध्यमाच्या या शाळेची खास धनगर समाजाच्या मुलामुलींसाठी प्रवेश देण्यासाठी निवड केलेली असून, आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व इतर प्रगत समाजातील विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी माहिती गोदावरी मनार पब्लिक स्कूलचे प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडेय यांनी दिली आहे.
शंकरनगर ता.बिलोली येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेची शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास या योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आलेली आहे.योजनेच्या अटी व शर्ती १) सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजाचा असावा. २) विद्यार्थ्याच्या पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या धनगर समाजाच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत सादर करावी. ३) विद्यार्थ्यांच्या पालकाची उत्पन्न मर्यादा रु.१ लाख इतकी असावी. ४) सन २०२१ २२ या वर्षात विद्यार्थी १ ली ते ५ वी इयत्तामध्ये प्रवेशित असावा.
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित व निवासी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकरिता गोदावरी मनार पब्लिक स्कूलच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेची शासनाकडून निवड करण्यात आली असून, जास्तीत जास्त धनगर, हटकर व इतर २६ पोटजातीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२साठी नामांकित शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर करावे, अशी माहिती प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडेय यांनी दिली आहे.