नायगांव नगरपंचायतच्या 3 जागेसाठी 78.44 टक्के मतदान, 13 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद.प्रतिक्षा निकालाची
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव नगर पंचायतची रणधुमाळी चालू असून दि.18 रोज मंगळवारी शांततेत मतदान झाले आहे. नायगांव नगरपंचायत मध्ये एकूण सतरा प्रभाग असून त्यातील तीन प्रभाग काँग्रेसचे बिनविरोध निवडून आले आहेत.तर 11 प्रभागासाठी 21 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 18 जानेवारी रोजी दुसऱ्या टप्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून ही दोन्ही निवडणूक प्रक्रियेची मत मोजणी 19 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.
नायगाव नगर पंचायती साठी दि 18 जानेवारी रोजी झालेल्या 3 प्रभागातील सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात एकूण 2370 मतदारांपैकी 1859 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 78.44% टक्के मतदान झाले आहे.
नायगांव नगर पंचायत मध्ये एकूण 17 प्रभाग असून त्यात 12256 मतदार असून त्यातील 3 प्रभागासाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी एकूण 4 बूथ नेमण्यात आले आहेत. 3 प्रभागात एकूण 2370 मतदार आहेत. त्यात 1195 पुरुष असून 1175 स्त्रिया मतदार आहेत.त्यापैकी 1859 मतदारांनी हक्क बजावला असून त्यात 924 पुरुष तर 935 महिलांनी हक्क बजावला आहे.
एकूण 3 प्रभागात झालेल्या मतदाना पैकी प्रभाग क्र.17 मध्ये सर्वाधिक म्हणजे 81.41 टके मतदान झाले तर प्रभाग 11 मधील बूथ क्र. 2 मध्ये 74.90 टके म्हणजे सर्वात कमी मतदान झाले.
मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. नगरपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी,सचिन गिरी व पोलीस उपअधीक्षक,तसेच तहसीलदार गजानन शिंदे,पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे ,प्रभारी मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर,पेशकार आलमवाड,या सह निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी व अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.
मतमोजणी प्रक्रिया 19 जानेवारी 2022 रोजी तहसिल कार्यालयात पार पडणार असून या साठी पाच टेबल लावण्यात आले आहेत.
एका टेबल वर एक प्रभाग असे पहिल्या फेरीत पाच मतदान केंद्राची असे एकूण चार फेऱ्यात मतमोजणी होणार असून,प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी व अतिरिक्त 15 असे एकूण 30 कर्मचारी नेमण्यात आले असून पहिला निकाल 10.30 ते 11 पर्यंत येण्याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी येणाऱ्या सर्वांसाठी दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्याशिवाय मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही असे निवडणूक विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
मतमोजणी केंद्रा बाहेर कोणताही अनुचित प्रकार घडूनये या साठी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.