मुख्य बाजारपेठेतील तीन कृषी दुकानाचे शटर वाकवून लाखोंचा ऐवज लंपास, तर अजून तीन दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला.

नायगाव पोलिसांच्या निष्कीर्यतेचा व्यापाऱ्यात संताप.

526

 

नायगांव रामकृष्ण मोरे

नायगाव शहरातील अगोदरच्या एकाही चोरीच्या घटनेचा तपास लागलेल्या नसतांनाच सोमवारी रात्री चोरट्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील तीन दुकानात शटर वाकून चोरी केली तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला आहे. दोन खत दुकान, एक आडत दुकानातील चोरीच्या घटनेत दोन लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या चोरीच्या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसापासून नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस सुस्त चोरटे सक्रीय झाले आहेत. पंधरा दिवसापुर्वी मांजरम येथे दिवसा धाडसी चोरी झाली यात लाखो रुपयाचा ऐवज लंपास करण्यात आला. या घटनेची नायगाव पोलीस ठाण्यात नोंद होण्याच्या पुढे काही झाले नाही तर दोन दिवसापुर्वी गडगा येथे किराणा दुकानात झालेल्या चोरीची घटना ताजी असतांना सोमवारी रात्री चोरट्यांनी नायगाव शहरातील पाच दुकाने फोडली.

- Advertisement -

यात चोरट्यांनी मातोश्री अँग्रो एजन्सीच्या शटर वाकवून दुकानात प्रवेश केला व गल्ल्यातील १ लाख ८६ हजार रुपये, दुसऱ्या घटनेत प्रगत शेतकरी केंद्रातून ५ हजार तर मोंढ्यातील व्यंकटराव पाटील चव्हाण यांच्या आडत दुकानातील कपाट फोडून दहा हजार लंपास केले. पण बालाजी ट्रेडिंग कंपणी, गजानन किराणा दुकानात चोरीचा प्रयत्न फसला आहे.

 

 सोमवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, उप निरक्षक बाचावार हे फौजफाट्यासह घटनास्थळी आले. त्यानंतर श्वान पथक आणि फिंगर प्रिंट तज्ञाचे पथकही आले. पण यांना काहीही माग काढता आला नसल्याने आलेले पथक हात हालवत परत गेले. तर बिलोलीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांनीही घटनास्थळी भेट देवून नायगाव पोलिसांना तपासाच्या सुचना दिल्या.

दरम्यान या चोरीच्या घटनेमुळे भयभीत झालेल्या व्यापाऱ्यानी नायगाव पोलिसांना निवेदन देवून चिंता व्यक्त केली असून. शहरातील यापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेचा तपास लागलेला नसताना पुन्हा होणाऱ्या चोऱ्यामुळे व्यापाऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील चोरीच्या घटनांना आळा बसवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.