पंचायत समितीमहाराष्ट्र

नायगांव नगरपंचायत निवडणूक : १७ ऐवजी १४ जागेसाठीच होणार मतदान


 

नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गाच्या सर्व जागांची निवडणूक आहे त्या टप्प्यावर तत्काळ स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अव्वर सचिव संजय सावंत यांनी मंगळवारी दिले आहेत. त्यामुळे नायगांव नगरपंचायतच्या १७ ऐवजी १४ जागेसाठीच दि.२१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना राज्य शासनाने ओबीसींच्या हक्कावर गदा येवू नये यासाठी अध्यादेश काढून ओबीसींना निवडणुकीच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आरक्षण सोडत दि. १२ नोव्हेंबर रोजी पार पडली. यावेळी नायगांव नगरपंचायत निवडणुकीसाठी ३ प्रभाग ओबीसीसाठी आरक्षित झाले होते.  त्याच बरोबर निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आणि नामनिर्देशन पत्रही दाखला करण्यास दि १ डिसेंबर पासून सुरुवात झाली.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटचा एक दिवस असतांना दि.६ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे आरक्षण रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय दिला शासनाने काढलेला अध्यादेशही रद्द केला. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणारे तर धास्तावलेच पण निवडणुकांचे काय होणार असाही प्रश्न निर्माण झाला होता.

सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ अन्वये अपील दाखल केले. सदर अपिलासह रिट पिटीशन क्रमांक १३१६/२०२१ मध्ये दि.६ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या आदेशानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या निवडणुका स्थगित ठेवण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केले आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी असेही आदेशित केले आहे की, या निवडणुकांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुढे सुरू ठेवून पूर्ण करण्यात यावी. त्यास अनुसरून संदर्भाधीन पत्रान्वये देण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार जाहीर करण्यात आलेल्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व जागांची निवडणूक आहे त्या टप्प्यावर तात्काळ स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अव्वर सचिव संजय सावंत यांनी मंगळवारी काढले आहेत.

त्यामुळे नायगांव नगरपंचायतच्या १७ ऐवजी १४ जागेसाठीच दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

          नायगांव शहरातील प्रभाग क्रमांक ७,११ व १७ हे ओबीसीसाठी आरक्षित झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने या जागासाठीची निवडणूकच रद्द केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »